महाडीबीटी फार्मर स्कीम पोर्टलवर अर्ज दाखल केलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक असा अपडेट आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन (PoCRA 2.0) अंतर्गत निवड झालेल्या गावातील शेतकऱ्यांचे अर्ज आता PoCRA च्या नवीन पोर्टलवर म्हणजेच NDKSP 2.0 (नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प) पोर्टलवर स्थलांतरित (Migrate) केले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरताना किंवा काही काम करताना येणाऱ्या “पोर्टल अंडर मेंटेनन्स” च्या समस्या याच स्थलांतरणाच्या कामामुळे येत होत्या.
पोकरा योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या ठिबक सिंचन, तुषार सिंचन यांसारख्या बाबींचे अर्ज स्थलांतरित केले जात आहेत. मात्र, हा बदल फक्त अशाच अर्जांसाठी लागू आहे, ज्यांना अद्याप ‘पूर्वसंमती’ (Prior Approval) मिळालेली नाही. ज्या शेतकऱ्यांच्या अर्जांना यापूर्वीच पूर्वसंमती मिळाली आहे, त्यांची पुढील प्रक्रिया मात्र महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरूनच केली जाईल. याशिवाय, ज्या शेतकऱ्यांची जमीन मर्यादा ५ हेक्टरपेक्षा जास्त आहे, त्यांना देखील महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरूनच लाभासाठी अर्ज करायचा आहे.














