मच्छिंद्र बांगर यांच्या अंदाजानुसार, उत्तरेकडील राज्यांमध्ये ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ (WD) सक्रिय झाला असून, डिसेंबर महिन्यात आणखी डब्ल्यूडी उत्तर भारतात दाखल होतील. हे डब्ल्यूडी मैदानी प्रदेशाकडे सरकल्यास काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर, अरबी समुद्रातील ढगाळ वातावरण आणि चेन्नईजवळील ‘दत्वाळ’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रावरही काही अंशी परिणाम दिसून येईल.
महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि दक्षिण मराठवाड्याच्या पट्ट्यात ४, ५ आणि ६ डिसेंबर दरम्यान ढगाळ हवामानाचा अंदाज आहे. याचा प्रभाव लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागापर्यंत पोहोचू शकतो.
या काळात दक्षिण सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या भागांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे ढगाळ वातावरण किरकोळ स्वरूपाचे असल्याने शेतकऱ्यांनी फारशी चिंता करण्याची गरज नाही, मात्र सावधगिरी बाळगावी.
सध्या विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा यासह संपूर्ण राज्यात थंडीची लाट कायम आहे. ४ तारखेपर्यंत थंडीचा प्रभाव जोरदार राहील. ५ तारखेला पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यात थंडी थोडी कमी होईल, परंतु ७ तारखेपासून थंडीचे प्रमाण पुन्हा वाढायला सुरुवात होईल. ८ किंवा ९ तारखेपासून पुन्हा कडाक्याच्या थंडीची लाट सुरू होण्याची शक्यता आहे आणि ११ तारखेपासून थंडीचा कहर वाढेल.
या अंदाजानुसार, १५ डिसेंबर ते १५ जानेवारी हा काळ अतिथंडीचा असेल, त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. थंडीचे प्रमाण घातक स्वरूपाकडे जात असल्याने स्वतःच्या प्रकृतीची, बालकांची, वृद्धांची तसेच जनावरांची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनी पिके वाचवण्यासाठी आवश्यक फवारण्यांचा अवलंब करावा, असा सल्ला मच्छिंद्र बांगर यांनी दिला आहे.