शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मोठी बातमी: जून २०२६ पर्यंत कर्जमाफी होणार, पण…
राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री महोदयांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल स्पष्टपणे गवाही दिली आहे, ज्यामुळे कर्जमाफी होणार की नाही याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात असलेला संभ्रम आता दूर झाला आहे. या घोषणेनुसार, राज्यातील अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी जून २०२६ पर्यंत केली जाणार आहे. मात्र, ही कर्जमाफी सरसकट नसेल, तर ती विशिष्ट अटी, शर्ती आणि निकषांवर आधारित असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
मागील काही दिवसांपूर्वी सहकार विभागाने एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय (जीआर) निर्गमित केला होता, ज्यात अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या कर्जात पुनर्घटन करण्याची मंजुरी देण्यात आली होती. तसेच, सहकारी बँकांना पुढील एक वर्षासाठी म्हणजेच जून २०२६ पर्यंत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची वसुली करू नये, असेही निर्देश दिले होते.
या निर्णयामुळे सरकार कर्जमाफीपासून दूर जात आहे की काय, अशा प्रकारचा एक गैरसमज मोठ्या प्रमाणात पसरला होता. याच पार्श्वभूमीवर, मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीत या प्रश्नाला उत्तर दिले आणि कर्जमाफीचे आश्वासन पुन्हा देत, शेतकऱ्यांचा गोंधळ संपवला.
सध्या ही कर्जमाफी कशा प्रकारे लागू करावी यासाठी एक विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती केवळ कर्जमाफीची अंमलबजावणी कशी करावी याचा अभ्यास करत नाहीये, तर शेतकरी वारंवार कर्जबाजारीपणाच्या या दुष्टचक्रात का अडकतो, याच्या मूळ कारणांचा देखील शोध घेत आहे. यापूर्वीच्या २०१७ आणि २०१९ मधील कर्जमाफीच्या अनुभवावरून, कर्जमाफीचा फायदा जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांना कसा मिळेल आणि तो बँकांपर्यंत मर्यादित न राहता थेट शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहोचेल, यावर समितीचा मुख्य भर आहे.
या समितीचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सादर होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर कोणते शेतकरी पात्र ठरतील व लाभाचे स्वरूप काय असेल, हे सर्व निश्चित केले जाईल. मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्ट गवाहीमुळे थकीत कर्जाच्या तणावाखाली असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.