पाकीस्तानची मदत नको रे बाबा ; श्रीलंकेत मदत उघडताच धक्का ; श्रीलंकेत अलीकडेच आलेल्या ‘दिटवाळ’ चक्रीवादळामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. या महाभयंकर वादळामुळे प्रचंड पूर आला, ज्यात ३९० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर सुमारे १.१ लाखांहून अधिक लोकांना फटका बसला आणि दोन लाखांहून अधिक लोक सध्या निवारागृहांमध्ये राहत आहेत. या संकटाच्या काळात भारताने भरभरून मदत पाठवून श्रीलंकेला मोठा आधार दिला. दुसरीकडे, बंधुत्वाच्या नात्याने मदत करण्याचा दावा करत पाकिस्ताननेही २९ नोव्हेंबर रोजी नौदलाच्या जहाजाद्वारे अन्नधान्य, वैद्यकीय साहित्य, तंबू आणि इतर आवश्यक वस्तू कोलंबो बंदरावर पाठवल्याची घोषणा केली.
मात्र, पाकिस्तानच्या या मदतीचा खरा चेहरा श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा ही मदत उघडली तेव्हा जगासमोर आला. पाकिस्तानने पाठवलेल्या अनेक पॅकेट्सची मुदत उलटून गेली होती; म्हणजेच ते वैद्यकीय साहित्य आणि खाद्यपदार्थ मुदत बाह्य (Expired) होते. ऑक्टोबर २०२४ ची एक्सपायरी डेट असलेले पदार्थ आणि औषधे या मानवतावादी संकटाच्या वेळी पाठवल्याने श्रीलंकेसह संपूर्ण जगाला धक्का बसला.
भारताशी स्पर्धा दाखवण्यासाठी आणि स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी पाकिस्तानने हे साहित्य पाठवले, पण ते निकामी निघाल्यामुळे ‘भीक नको पण कुत्रावर’ अशी श्रीलंकेची अवस्था झाली. यापूर्वीही, २०१५ च्या नेपाळ भूकंपात गोमांस असलेले फूड पॅकेट्स पाठवणे किंवा २०२१ मध्ये तुर्कीला तुर्कीनेच पाठवलेली मदत पुन्हा पॅकेज करून पाठवणे, असे ढोंगी प्रकार पाकिस्तानने केले आहेत.
याउलट, भारताने ‘ऑपरेशन सागर बंधू’ अंतर्गत श्रीलंकेला ५३ टन मदत साहित्य पुरवले. यात अन्नधान्य, ब्लँकेट, स्वच्छता कीट आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश होता. तसेच, भारताने वैद्यकीय पथक आणि एनडीआरएफचे ८० जवानही श्रीलंकेला रवाना केले. विशेष म्हणजे, पाकिस्तानच्या मदतीच्या विमानासाठी भारताने आपले हवाई हद्द (Airspace) केवळ चार तासांत खुली केली, जो माणुसकीच्या दृष्टिकोनातून घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय होता, कारण यापूर्वी पाकिस्तानने भारतीय विमानांना हवाई हद्द वापरण्याची परवानगी दिली नव्हती.
या घटनेतून हे सिद्ध झाले की मदत करण्यासाठी नियत आणि माणुसकी असावी लागते. मुदत बाह्य साहित्य पाठवून पाकिस्तानने आपला खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर उघड केला आहे, ज्यामुळे मित्र आणि केवळ मदत करणाऱ्या देशातील फरक स्पष्ट झाला आहे.